📜 गावाचा इतिहास
गोंदे दुमाला गाव हे इगतपुरी तालुका व नाशिक जिल्हा ह्रा दोन्हींच्या मध्यभागी येते. गोंदे दुमाला गावालगत मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 जात असुन गावापासुन 5 कि.मी. अंतरावर पाडळी रेल्वे स्टेशन नावाचे रेल्वे स्टेशन आहे. गोंदे दुमाला गावामध्ये अंदाजे 80 ते 85 लहान मोठे औद्योगिक कारखाने असल्यामुळे नाशिक जिल्ह्रामध्ये गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख आहे. 2011 च्या जनगणनेनुसार गोंदे दुमाला गावाची लोकसंख्या 3792 इतकी आहे. गोंदे दुमाला गाव हे औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामानिमित्त राज्यातील व परराज्यातील अंदाजे 10 ते 15 हजार लोक गावामध्ये वास्तव्य करतात. गावामध्ये मारुती मंदिर, काशाई मंदिर, भवानी मंदिर, मुंजाबाबा मंदिर, खंडेराव मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिर इ. मंदिरे असुन गावातील सर्व धर्माचे लोक एकोप्याने राहतात व वावरतात. गावामध्ये सर्व धर्माचे सण - उत्सव साजरे केले जातात.
गोंदे दुमाला गावातील 100% गावअंतर्गत रस्ते काँक्रिटिकरण झालेले असुन गावातील 100% गटारी भुमिगत करण्यात आले आहे. सन 2009/2010 मध्ये भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजुर झालेली होती त्यातुन मुकणे धरण ते गोंदे दुमाला जलशुध्दीकरण केंद्र असे 1900 मीटर अंतरावर पाईपलाईन केली असुन गावामध्ये दररोज दोन वेळेस पाणीपुरवठा करण्यात येतो. घंटागाडी व्दारे गावामधुन दररोज कचरा संकलन करण्यात येतो व सदरच्या कचराची कचरा डेपो येथे विल्हेवाट लावली जाते. गावामध्ये एकच स्मशानभुमी असुन गावातील सर्व समाजाचे लोक एकाच स्मशानभुमीचा वापर करतात.
मुंबई राष्ट्रीय महामार्गावर जिल्ह्रात प्रसिध्द असे ग्रामदैवत भवानी मातेचे उंच टेकरीवरील मंदिराच्या कळसाचे दर्शन गावाच्या चारही होते. चैत्रपौर्णिमेनिमित्त गोंदे दुमाला गावात भवानी मातेचा मोठा उत्सव होत असतो. चैत्रपौर्णिमेनिमित्त गोंदे दुमाला येथील भवानी मातेच्या यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात केले जाते. यात्रेच्या दिवशी गावातील तरुण वणी येथील सप्तश्रृंगी गडावर जाऊन कावडीने पाणी आणून जलाभिषेक करतात. देवीला साजश्रृंगार चढवल्यानंतर देवीची हलगीच्या ठेक्यावर सजवलेल्या रथातून संपूर्ण गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येते. सर्व कार्यक्रम ग्रामपंचायत गोंदे दुमाला व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात येते.